नारायणगाव , प्रतिनिधी
मांजरवाडी येथे मुलानेच आपल्या बापाचा खून केला असून फरार आरोपीला नारायणगाव पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. मांजरवाडी गावच्या हद्दीत खंडागळे मळा येथे गणेश ज्ञानेश्वर खंडागळे वय वर्ष ३८ याने त्याचे वडील ज्ञानेश्वर नाथा खंडागळे वय ५५ वर्ष ( दोघेही राहणार मांजरवाडी ता. जुन्नर जि. पुणे) यांना तुम्ही बहिणीकडे चाकणला राहण्यास का जाता? या कारणावरून शिवीगाळ करून त्यांच्या छातीवर,पोटावर व डोक्यावर लाथा मारून गंभीर दुखापत केली. ज्ञानेश्वर खंडागळे यांना उपचारासाठी पुणे येथे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.फरार आरोपी गणेश खंडागळे याला काल गुरुवार दिनांक १६ जुलै रोजी रात्री ९ वाजून ४८ मिनिटांनी नारायणगाव पोलिसांनी अटक केली असून नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई आनंदा चौगुले यांनी यासंदर्भात नारायणगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.भारतीय न्याय संहिता(बी एन एस) 2023 कलम118(1), 118(2), 115(2), 352, 351(2), 351(3)* प्रमाणे नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार हे करीत आहेत.




