जुन्नर चे उपवनसंरक्षक म्हणून प्रशांत खाडे यांनी नुकताच पदभार स्वीकारला.नुकतीच या पदावर काम करणाऱ्या उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर प्रशांत खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घोड प्रकल्प वनविभाग, जुन्नर चे उपवनसंरक्षक म्हणून अमोल सातपुते यांनी तीन वर्षाहून अधिक काळ काम पाहिले. त्यांच्या कालखंडात बिबट मानव संघर्षाचे आव्हान त्यांनी यशस्वीरित्या पेलले व वन विभाग क्षेत्रात अनेक महत्त्वाची कामे पूर्णत्वास नेली यात शिवनेरीवर चार उद्याने, गडाच्या पायथ्याशी एक उद्यान, चार पर्यटन निवासस्थाने, पर्यटन गाईड प्रशिक्षण कार्यक्रम, वन विभागामार्फत दोन पुस्तकांचे प्रकाशन, आदी समाविष्ट आहे. माणिकडोह बिबट निवारण केंद्राला साडेबारा हेक्टर जमीन मिळवून देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मेंढपाळांना तंबू व सौर दिव्यांचे वाटप केले. राज्यात प्रथमच सौर कुंपण ही योजना त्यांनी राबविली. सातपुते यांच्या जागेवर नियुक्ती झालेले प्रशांत खाडे यांच्यापुढे जुन्नर आंबेगाव खेड शिरूर तालुक्यातील बिबट व मानव संघर्ष रोखणे व महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका असलेल्या जुन्नरच्या वन वैभवात भर घालणे या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. पावसाळ्यात जुन्नर विभागात नाणेघाट,माळशेज घाट ,दाऱ्या घाट, हरिश्चंद्रगड आदी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते त्याचे नियोजनही प्रशांत खाडे यांना करावे लागणार आहे.




