नारायणगाव, दि.२३ नारायणगाव शहर झपाट्याने वाढत आहे. असे असले तरी गावातील काही परिसरात अतिक्रमणाचा विळखा वाढत चालला आहे. एस टी बसस्थानकापासून पूर्ववेस, पश्चिम वेस, मुख्य बाजारपेठ, पूर्ववेशीपासून मुक्ताई मंदिरापर्यंत व जुन्नर रस्ता अनाधिकृत अतिक्रमणाने व्यापला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला रस्त्यावरून चालणे जिकरीचे झाले आहे.दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता केशव जाधव यांनी नारायणगाव ते जुन्नर मढ रस्त्यांवर अतिक्रमण केलेल्या २५ व्यवसायिकांना अतिक्रमण असल्याबाबतच्या नोटीसा बजावल्या आहेत. नोटीस मध्ये स्वखर्चाने अतिक्रमण काढून घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या असल्या तरी त्यासाठी ठराविक कालमर्यादा दिलेली नाही. त्यामुळे नारायणगाव शहरातील अतिक्रमण कारवाईबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग खरंच अॅक्शन मोडवर येईल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अतिक्रमणावर टांगती तलवार असल्याचे दिसून येते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सर्वसामान्य नागरिकांचा व प्रवाशांचा त्रास लक्षात घेऊन अनधिकृत अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून देणार का ? याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.




















